दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना भारतीय लोकशाही रत्न मानवंदना

निवडणूक आयोगाला पगारहमी पांढरा मकात्या घोषित आचारसंहितेच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्रात अनागोंदी चालवल्याचा ठपका

नगर (प्रतिनिधी)- देशात निवडणुकीची संहिता लागू करून उन्नत लोकशाहीला चालना देणारे दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शहरातील हुतात्मा स्मारकात भारतीय लोकशाहीरत्न अशी राष्ट्रीय मानवंदना देण्यात आली. तर आचारसंहितेच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्रात अनागोंदी चालवल्याचा ठपका ठेऊन सध्याच्या निवडणूक आयोगाला पगारहमी पांढरा मकात्या संघटनेच्या वतीने घोषित करण्यात आले.
प्रारंभी महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन अमर रहे! च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी ॲड. कारभारी गवळी, अशोक भोसले, डॉ. योगेंद्र खाकाळ, आनंदा आढाव, रमा आढाव, शाहीर कान्हू सुंबे, दिलीप जाधव, पोपट भोसले, अरुण खिची, अमित थोरात, नारायण रोडे, वीरबहादूर प्रजापती, दिलीप घुले, सुधीर भद्रे, अशोक सब्बन, संतोष खामकर आदी उपस्थित होते.
हजारो लोकांना जिल्ह्याबाहेर काढण्यात आले, खोटे भरले त्याचवेळेला पुढाऱ्यांच्या बॅगा तपासण्याचे नाटक सुरू ठेवले. परंतु मतदारापर्यंत 3 ते 5 हजार रुपयांची रक्कम मतामागे वाटले जाते आणि हजारोंच्या संख्येने लोकांच्या खाणवळी चालू आहेत, याकडे आयोगाचे दुर्लक्ष आहे. म्हणून सध्याचे निवडणूक आयोगाला पगार हमी पांढरा मकात्या घोषित केल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.
पगार हमी म्हणजे फक्त पगाराचे धनी आणि कामाच्या नावाने बोंबाबोंब, पांढरा मकात्या हा शब्द पांढरा हत्ती यापासून तयार झाला आहे. मकात्या म्हणजे मला काय त्याचे? होईल ते होऊ दे!  त्यातून तयार झालेला आहे. एकंदरीत सध्याचा निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर आहे. त्याचे निषेध म्हणून या आयोगाला पगारहमी पांढरा मकात्या घोषित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संघटनांनी महाराष्ट्रात ऑपरेशन ढब्बू मकात्या लॉकडाऊन जारी केले. यातून ढब्बू मकात्या व सत्तापेंढारी ओळखा आणि शेजाऱ्याला कळवा, असेही संघटनेने नागरिकांमध्ये संदेश जारी केला आहे. सध्याच्या सत्तापेंढाऱ्यांविरुद्ध लोकशाही डिच्चूकावा व आणि डिच्चूफत्ते राबविणे हा एकच मार्ग असल्याची भावना ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली.
देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात सत्तापेंढाऱ्यांनी कुबेरशाही आणली आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, तो गुंडांच्या टोळ्या सांभाळतो. मतदारांना विकत घेऊन जातीच्या नावावर सत्ताकाबीज करतो आणि त्यातून नागरिकांचे शोषण सुरु असल्याचे सुधीर भद्रे यांनी सांगितले.