ऐतिहासिक परंपरा असलेला गुंडेगावचा बैल पोळा आजही होतोय उत्साहात साजरा

ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण.

ऋषिकेश राऊत :-

श्रावण वद्य अमावस्याला बैलपोळा म्हणून ओळखला जाणारा सण बैलपोळा म्हणजे लोक संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणून ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे.

आजही आपल्या भारत देशात बहूतांशी लोक खेड्यात राहतात असताना येथील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती, शेतीवरच सर्वस्वी जीवन अवलंबून असते.आणि ह्या शेती कामात शेतकरी राजाला मदत करणारा सोबती म्हणजे बैल आणि ह्या मुक्या प्राण्यावर जो सोबती वर्षभर शेतात राब-राब राबतो त्याच्यावर भरभरून माया करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा..

या दिवशी आपला बैल देखना दिसावा म्हणून शेतकरी राजा आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार करतो.ह्या दिवशी बैलाला नांगर अथवा गाडीला जुंपले जात नाही.तर त्याचे पूजन करतात.बैलाला धुऊन अंघोळ घातली जाते.व खांदमळणी करुन शिंगे साळून शिगांना हेंगूळ लावून रंगिबेरंगी बेगडपट्टी चिकटवल्या जातात.वाखाची किंवा सुताची नवी म्होरकी, नवी वेसण,नवा कासरा सर्व काही नवे व रंगीत घेतले जाते.अंगावर झुल घातली जाते.

घागरा-घुंगरमाळी व दृष्टमनी घातले जातात.कपाळावर बाशिंग बांधले जाते.पायात तोडे घालून सजवतात, गावातील मुख्य वेशीतुन वाजत-गाजत बाजारपेठेतून मिरवणूक काढून देव दर्शन केले जाते. हा सजवलेला सोबती पाहून शेतकरी राजांचे डोळे भरुन येतात.घरातील सुवासिनी पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून पुजा करतात, ज्वारी गव्हाचे समोर दान मांडले जाते.गावगाड्यात सर्व मुलबाळांना बैलपोळा म्हणजे आनंदाचा क्षण असायचा.बैलपोळा आला की सर्व शेतकरी,पोरं आठ दिवस अगोदरच तयारीला लागायची.आजही गाव-गाड्यात असे जातीवंत बैल पाळून त्यावर पुत्रवत प्रेम करणारे गुंडेगावात आजही खुप शेतकरी आहेत.जीवापाड या बैलांचा सांभाळ करत असताना त्यांचा लळा लावून घेतात.अशा शेतकरी राजांचा प्रत्येकाला अभिमान वाटतो.काळ बदलला वेळ बदलली असली तरी गुंडेगावच्या गाव-गाड्यात त्याच उत्साहाने हा सणाचा वारसा आजही जपला जातो आहे.गुंडेगाव येथे श्री कारभारी आगळे,कमल आगळे,सौ.रेश्मा आगळे,सौ.रुपाली आगळे,अर्जून आगळे,गोरख लोखंडे, यांनी बैलपोळ्यानिमित्त बैलांना पुरणपोळीचा प्रसाद देऊन पुजन केले यावेळी हे सण आपली संस्कृती परंपरा जतन करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे यातून संदेश दिला.