तिरुमला मंदिरात चार तासांची शुद्धीकरण पूजा

तिरुमला मंदिराच्या लाडू प्रसादावरील वादानंतर मंदिरात विशेष अनुष्ठान झाले. प्रसादासाठी भेसळयुक्त तुपाच्या वापरामुळे निर्माण झालेल्या अपवित्रतेला दूर करण्यासाठी मंदिरात ‘शांती होम पंचगव्य प्रोक्षण’ (शुद्धीकरण अनुष्ठान) करण्यात आले. देवस्थानमचे हे अनुष्ठान सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत चालले. त्यात २० पुजारी सहभागी झाले. अन्नप्रसादम पाकगृहाची शुद्धीही करण्यात आली. प्रसाद तयार करण्यासाठी वापरलेल्या प्राण्यांच्या चरबीच्या कथित कृत्याने अपवित्र झालेल्या मंदिराला शुद्ध करणे हा त्यामागील उद्देश आहे. टीटीडीचे कार्यकारी अधिकारी जे. श्यामला राव म्हणाले, यामुळे नकारात्मक परिणाम नष्ट होऊन प्रसाद लाडूची पवित्रता पुन्हा प्रस्थापित झाली.तत्पूर्वी, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात प्रसाद लाडूत चरबी असलेल्या तुपाचा आणि माशांचा वापर केला गेला, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. परंतु जगन यांनी हा आरोप फेटाळला.

न्यायालयाच्या निगराणीत तपासासाठी सुप्रीम कोर्टात केली याचिका दाखल
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणाचा तपास कोर्टाच्या निगराणीत करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाचे स्रोत व नमुन्यावर सविस्तर अहवाल दाखल करण्यासाठी आंध्र सरकारला आदेश देण्याची विनंती याचिकेत केली आहे. विंहिपनेही या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत सुनावणी करण्याचा आग्रह केला.