पारनेरच्या शिक्री, तास, देसवडे परिसरातील अवैध वाळू उत्खनन थांबवावे
स्पॉट पंचनामा करून वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा नदी पात्रात आंदोलनाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे शिक्री भागातील शासकीय वन विभागाच्या हद्दीत बेसुमार सुरु असलेल्या अवैध वाळू उत्खनन थांबवून स्पॉट पंचनामा करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास शिक्री, पवळदरा, देवसडे नदी पात्रात स्थानिक नागरिकांसह जनआंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील मौजे शिक्री, तास, देसवडे या भागातून पारनेर तहसील कार्यालय व पोलीस प्रशासन यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व खुलेआम वाहतूक सुरू आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी अर्ज करून देखील कुठलीही कारवाई पोलीस प्रशासन व महसूल विभाग करत नाही. फक्त ज्या वाहनांचे हप्ते वेळेत आले नाही, त्याच वाहनांवर कारवाई केली जाते. काही वाहने पकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करून सोडून दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिक्री, देसवडे या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो. त्यांच्या जमिनी या भागात आहेत, परंतु वाळू तस्कर दहशत करून आदिवासी समाजावर अन्याय करत आहेत. फॉरेस्ट हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करून वाळू उत्खनन केले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून, प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे म्हंटले आहे.
शिक्री, देसवडे भागातील अवैध वाळू उत्खननाचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभाग कडून करण्यात यावे, वाळू तस्करांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा व त्यातील संघटित गुन्हेगारांविरुद्ध मुक्कांतर्गत (एनपीडी) कारवाई पंधरा दिवसात न झाल्यास आंदोलन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.