थंडीपासून बचावासाठी प्रशासनाचे आवाहन; नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे वापरावे

अहिल्यानगर : जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून तापमान वारंवार १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. गुरुवारी तापमानाचा पारा ७.५ अंशापर्यंत खाली घसरला होता. आगामी काळातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहूराज मोरे यांनी केले आहे. थंडीच्या लाटेबाबत स्थानिक हवामान अंदाज रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रांद्वारे नियमित तपासावा. नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे तसेच चादर यांसारखे पुरेसे उबदार कपडे वापरावेत. शक्यतो थंड • वाऱ्यात बाहेर जाणे टाळावे व शरीर कोरडे ठेवावे. शरीर ओले झाल्यास त्वरित कपडे बदलून शरीरातील उष्णता टिकवावी. निरोगी अन्न, विशेषतः व्हिटॅमिन सीयुक्त फळे व भाज्यांचा आहारात समावेश करावा. शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी गरम पेय किंवा द्रव्यांचे नियमित सेवन करावे. लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी. थंडीत दीर्घकाळ राहिल्यास त्वचेवर निस्तेजपणा किंवा बधीरता जाणवू शकते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थंडीमुळे थरकाप जाणवल्यास तातडीने उबदार ठिकाणी जावे. पशुधन आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांचे थंडीपासून संरक्षण करावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास नजीकचे आरोग्य केंद्र, रुग्णालय किंवा १०८ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही मोरे यांनी केले आहे.