महाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई – सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत आहे.परंतु मागील काही दिवसांत अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. लोकांना काळजी घ्या सांगणारेच प्रतिनिधी पॉझिटिव्ह आल्याने चिंता निर्माण झाली आहे.महाविकास आघाडी सरकारमध्ये तब्बल 12 मंत्र्यांना कोरोना झाला आहे. आता 12 वे मंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.नुकतीच त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. तसेच जवळपास 22 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
आता शिवसेना खासदार अरविंद यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अरविंद सावंत यांनी ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली होती.मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं, की डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरु आहेत . आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. सुरुवातीला आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाची लागन झाली होती. राज्यातील 22 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
तसेच नुकतेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची बाधा झाल्याचे समोर आले. ज्येष्ठ नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील पॉझिटिव्ह आले होते. खासदार सुजय विखे, मंत्री प्राजक्त तनपुरे यांना देखील कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोनाच्या या लाटेत राजकीय नेते आणि मंत्र्यांमध्ये कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झालेली दिसून येत आहे.