सावेडीच्या आनंद योग केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
नगर शहर योग साधनेचे केंद्र बनविण्याचा संकल्प -दिलीप कटारिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- योग-प्राणायामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी निशुल्क योग शिबिर राबविणार्या आनंद योग केंद्राच्या वतीने सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेच सुरु झालेल्या या योग शिबिरास मोठ्या संख्येने योग साधक सहभागी झाले होते.
योगमय वातावरणात दीडशेपेक्षा जास्त साधकांनी आयुष मंत्रालयाच्या निर्देशानूसार सूक्ष्म हालचाली, समस्थिती, शयनस्थिती, विपरीत शयनस्थिती, दंडस्थितीतील सर्व आसने, प्राणायाम, ध्यानाचा अभ्यास केला. केंद्रप्रमुख दिलीप कटारिया व केंद्रसंचालक चंद्रशेखर सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. योग दिनाच्या कार्यक्रमात पुरुषांसह महिला देखील उत्सफुर्तपणे सहभागी झाल्या होत्या.
गेल्या पाच वर्षांपासून आंनद योग केंद्र निशुल्क योगाचे वर्ग घेत आहेत. असंख्य साधक याचा फायदा घेत असून, अनेकांच्या व्याधी दूर झाल्या आहेत. आजच्या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व साधकांनी नित्यनियमाने योग करण्याचा संकल्प केला.
केंद्रप्रमुख दिलीप कटारिया म्हणाले की, स्पर्धेच्या युगात प्रत्येक पुरुष व महिला तणावाखाली वावरत आहे. दुर्धर आजारावर मात करण्याची शक्ती योगामध्ये आहे. निरोगी आरोग्य व तणावमुक्तीसाठी योग, प्राणायाम व ध्यानधारणा हे सर्वोत्तम पर्याय आहे. आनंद योगच्या वतीने नगर शहर योग साधनेचे केंद्र बनविण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी योग शिक्षिका प्रतिक्षा गीते, स्वाती वाळुंजकर, पूजा ठमके, उषा पवार, मनिषा गायकवाड, सोनाली जाधवार, प्रशांत बिहाणी, निहाल कटारिया, नरेंद्र गांधी यांचे सहकार्य लाभले.