एल अ‍ॅण्ड टी कंपनीतील कामगारांच्या फसवणुकप्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

कंपनीच्या अध्यक्षांसह इतरांना कोर्टाचा समन्स

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयात एमआयडीसी येथील एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे अध्यक्ष ए.एम. नाईक आणि इतरांना कंपनीत आर्थिक अपहार करून सामान्य कामगारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी समन्स बजाविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी दिली.
अहमदनगर एमआयडीसीच्या एल अ‍ॅण्ड टी एम्प्लॉईज वेलफेअर ट्रस्टच्या नावाने कंपनीचे अध्यक्ष आणि इतर अधिकार्यांनी 30 हजारांहून अधिक कर्मचार्यांच्या मासिक पगारातून पैसे घेऊन आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार एका कर्मचार्याने अ‍ॅड. कौस्तुभ कुलकर्णी यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. ज्याची आवश्यक कागदपत्रेही कोर्टात सादर करण्यात आली आहेत. त्यासोबतच कंपनी व्यवस्थापनाकडून होत असलेल्या आर्थिक आणि शोषणाची कागदपत्रेही या कर्मचार्याने कोर्टात सादर केली. त्यावर न्यायालयाने एमआयडीसी पोलिस ठाण्याला चौकशीचे आदेश दिले होते.
तपासात पोलीस ठाण्याच्या वतीने तपास अहवाल फिर्यादीच्या बाजूने न्यायालयात देण्यात आला. तक्रारदाराचे वकील अ‍ॅड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी युक्तिवाद करतांना तक्रारदाराची बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. या युक्तीवादानंतर न्यायालयाने 2 जून रोजी निर्णय देताना आरोपी ए.एम. नाईक, आर.एन. मखीजा, आर.के. मल्होत्रा आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता, 1860 (आयपीसी) च्या कलम 420 नुसार आणि 34 अन्वये कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. सर्वांना 31 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले असल्याचे म्हंटले आहे.
अ‍ॅड. कौस्तुभ कुलकर्णी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या प्रकरणातून एम.आय.डी.सी मध्ये सामान्य कामगारांची झालेली आर्थिक फसवणुक व शोषण उघडकीस येणार आहे. भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असणारे कामगार कल्याण साध्य करण्यासाठी न्यायालयीन लढाई शेवटपर्यंत लढून वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. तक्रारदार गेल्या दीड वर्षांपासून कागदपत्रांची जमवाजमव करत होते. सर्व कागदपत्रांचे अवलोकन करून न्यायालयाने अपहारप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहे. या प्रकरणी अ‍ॅड. कुलकर्णी आणि आशिष सुसरे काम पाहत आहे.