चाईल्ड लाईनच्या टिमला पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर रेनकोटचे वाटप

हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- बालकामगार, बालभिक्षेकरी, बालविवाह, बालकांचे लैंगिक शोषण आदी अल्पवयीन मुलांच्या प्रश्‍नांवर 24 तास कार्य करणार्‍या चाईल्ड लाईनच्या टिमला पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, साहित्यिक तथा स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक के. बालराजू व हनुमान मंदिराचे पुजारी रामदास कावट यांच्या हस्ते हस्ते चाईल्ड लाईनच्या सदस्यांना रेनकोट वितरीत करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजीटल मीडियाचे आफताब शेख, संजय इस्सर, मोहसीन सय्यद, नवेद शेख, रमीज शेख, शफी सय्यद, चाईल्ड लाईनचे शाहिद शेख, सिमा कांबळे, राहुल वैराळ, आलिम पठाण, मंजुषा गावडे, राहुल कांबळे, वसिम शेख, प्रविण कदम, महेश सुर्यवंशी, प्रविण बुरम आदी उपस्थित होते.
चाईल्ड लाईन लहान मुलांचे प्रकरण दिवस-रात्र एक करुन हाताळत असतात. ऊन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता त्यांना आलेल्या प्रकरणासाठी धावपळ करावी लागते. पावसाळ्यात मोटारसायकलवर फिरताना त्यांना भिजत-भिजत जावे लागत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्यांच्यासाठी रेनकोटची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मन्सूर शेख यांनी दिली.
हरजितसिंह वधवा म्हणाले की, मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान फक्त पत्रकारांसाठी नव्हे, तर सामाजिक बांधिलकीने कार्य करत आहे. विविध उपक्रमातून सामाजिक सलोखा राखण्याचा देखील प्रयत्न केला जातो. विविध घटकांच्या सेवेसाठी त्यांचा नेहमी पुढाकार असतो. निस्वार्थ योगदानाने सामाजिक बांधिलकी जपून, समाजाला दिशा देण्याचे कार्य सुरू आहे. तर सामाजिक कार्य करणार्‍यांना देखील पाठबळ देण्यासाठी पुढाकार घेऊन चाईल्ड लाईनला दिलेली रोनकोटची मदत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
के. बालराजू म्हणाले की, भगवद्गीते मध्ये धर्माचे रक्षणासाठी भगवान अवतार घेतात, असे सांगितले आहे. धर्माच्या रक्षणासाठी भगवंत स्वतः येतात, तर कधी देवदूत पाठवतात किंवा आपले कार्य करण्यासाठी भक्तांना निवडतात. सर्वांच्या थोड्या थोड्या योगदानाने समाज सावरला आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमता व योग्यतेनुसार सामाजिक योगदान द्यावे. कलियुगात दहा टक्के लोकांच्या सामाजिक योगदानाने नैतिकता टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.
पुजारी रामदास कावट म्हणाले की, अनेकांच्या अडचणीच्या काळात मरहुम हाजी अजीजभाई माणुसकीने उभे राहिले. सामाजिक भावनेने त्यांनी कार्य केले. हाच त्यांचा सामाजिक वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची मुले पुढे चालवित असल्याचे त्यांनी सांगितले.
काम करताना अडचणी आल्यास मनात नैराश्याची भावना येते. मात्र अशा सामाजिक संघटनांनी प्रोत्साहन दिल्यास काम करण्याचे हुरुप येते. हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषद दरवर्षी हा उपक्रम राबवून समाजात कार्य करण्यास प्रोत्साहन देत असल्याची भावना चाईल्ड लाईनच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजू भागानगरे यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.