दिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .

दिल्लीच्या जगप्रसिद्ध लाल किल्ल्यात सध्या भारत सरकार संस्कृति मंत्रालय व दिल्ली मराठी प्रतिष्ठान तर्फे हिन्दी भाषेतील “राजा श्री शिवछत्रपती” या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत.मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज ज्या मराठा राजे व सरदारांनी दिल्लीत फडकवत ठेवला अशा घराण्यांचा यथोचित गौरव या महानाट्यानिमित्त करण्यात आला.त्यात थोरले छत्रपती शाहूमहाराज व श्रीमंत नानासाहेब पेशवा यांच्या दिल्लीतील मराठा फौजेचे 21वर्षे सेनापतीपद सांभाळलेले सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांच्या कर्तृत्वाचा घोष यावेळी करण्यात आला.मराठ्यांच्या फौजेचे सेनापती म्हणुन सरदार अंताजी माणकेश्वर गंधेना बादशहाच्या दरबारात उपस्थित रहाण्याचा सप्तहजारी मान होता.पानिपत युद्धात त्यांना वीरगती प्राप्त झाली.गंधे घराण्याचे देशाप्रती योगदान म्हणून याप्रसंगी सरदार अंताजींच्या नवव्या पिढीचे वंशज, ज्येष्ठ माध्यमतज्ञ श्री योगेश्वर गंधे यांचा गौरव सरकारच्या संस्कृति मंत्रालयाच्या सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भारताचे लष्कर प्रमुख जन. मनोज पांडे,दिल्लीचे खासदार मनोज तिवारी,केंद्रीय राज्यमंत्री ना.मीनाक्षी लेखी,बीड येथील माणिकराव बावणे सरकार,दिल्ली प्रतिष्ठानचे वैभव डांगे,मुकुल गंधे, अनेक देशांचे राजदूत,विविध ऐतिहासिक घराण्यातील वंशज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरदार गंधे घराणे हे नगरचे असून ऐतिहासिक कामरगांवचे संस्थापक आहेत.लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा सत्कार लाल किल्ल्यात झाला ही नगरकरांसाठी भुषणावह आणि अभिमानास्पद बाब आहे.असे विश्व हिन्दु परिषदेचे जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे यांनी सांगितले.

दिल्लीतील लाल किल्ल्यावर नगरच्या सरदार गंधे घराण्याच्या गौरव प्रसंगी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष व खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना योगेश्वर गंधे,लष्कर प्रमुख जन.मनोज पांडे,खासदार मनोज तिवारी,बेगम शाहिन बहादूर,मुकुल गंधे आदी.