रतडगावच्या जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
योगाने शरीरात ऊर्जा व जीवनात उत्साह निर्माण होतो -आरती शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शरीरात ऊर्जा व जीवनात उत्साह निर्माण करण्याचे काम योग करत असते. रोज योग केल्याने आपल्या जीवनातील ताण-तणाव नाहीसा होतो. अनेक दुर्धर आजारांवर योगा प्रभावी ठरत आहे. प्राचीन संस्कृती पासून योगाला फार महत्त्वाचे स्थान आहे. निरोगी जीवन व मनशांतीसाठी योग आणि ध्यान सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु योग करताना योग्य पद्धत व शास्त्रोक्त माहिती समजावून घेतल्यास त्याचा फायदा मिळणार असल्याचे प्रतिपादन उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे यांनी केले.
नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय व उडान फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस रतडगाव (ता. नगर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होत्या. याप्रसंगी मुख्याध्यापक शेख अब्दुल, शिक्षिका दीपा टोणे, संगीता दुसुंगे, प्रल्हाद राठोड, संगीता राऊत, अक्षय शिंदे, राष्ट्रीय सेवाकर्मी दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
प्रारंभी आरती शिंदे योगचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिकासह योगासने विद्यार्थी व युवकांकडून करुन घेतले. या कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक शिवाजी खरात, लेखापाल सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, जय युवाचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, रावसाहेब काळे यांचे मार्गदर्शन लाभले. या योग कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांसह गावातील युवक-युवतींचा प्रतिसाद लाभला.