भिम शक्तीचे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालया समोर धरणे

अल्पसंख्यांक, भटके, विमुक्त व मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्यांक, भटके, विमुक्त व मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीसाठी भिम शक्तीच्या वतीने गुरुवारी (दि.22 जून) जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर न्याय मिळण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.
माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भिम शक्तीचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कर्डक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास कास्ट्राईब महासंघाच्या वतीने राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात भिम शक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास आरोळे, पाथर्डी तालुकाध्यक्षा सुनिता भोसले, अशोक पगारे, भाऊसाहेब आरोळे, प्रशांत साळवे, तालुका सरचिटणीस रमेश बोरुडे, दिलीप कसबे, अनिकेत जाधव, दादासाहेब गायकवाड, सुरेश देठे, कास्ट्राईबच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, सुहास धीवर आदी सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये असलेल्या कर्मचार्‍यांना विनंती बदल्या होत नसून, विविध ठिकाणी मागासवर्गीयांचा अनुशेष भरला जात नसल्याचे भिम शक्तीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. सदर विनंती बदल्या करुन, मागासवर्गीयांचा अनुशेष भरला जावा, अनुकंपा तत्त्वावर मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना तातडीने सेवेत घ्यावे, राहुरी एज्युकेशन सोसायटीवर प्रशासक नियुक्त करावा, मेडिकल बिल, भविष्य निर्वाह निधीच्या रकमा व इतर नियमित कामकाज करताना भविष्यात भ्रष्टाचार होणार नाही याबाबत संबंधितांना आदेश देण्याची मागणी भिम शक्तीच्या वतीने करण्यात आली.