अर्थसंपन्न होण्यासाठी शेअर बाजार हा चांगला पर्याय -डॉ. सागर बोरुडे

मराठी भाषेतून युवकांना मोफत शेअर बाजारचे मार्गदर्शन

पारंपारिक व्यवसायाला नवी दिशा देण्याबरोबरच युवकांनी शेअर बाजारचे ज्ञान आत्मसात करुन त्यामध्ये गुंतवणुक केली पाहिजे. स्पर्धा व तंत्रज्ञानाच्या युगात मार्केट ग्लोबल झाले असून, अर्थसंपन्न होण्यासाठी शेअर बाजार हा चांगला पर्याय आहे. युवकांनी एका व्यवसायावर विसंबून न राहता इतर व्यवसायाबरोबरच शेअर मार्केटमध्ये उतरण्याचे आवाहन नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केले.
चर्मकार विकास संघ व लोकनेते सीतारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारकाच्या सभागृहात अर्थसाक्षरतेकडून अर्थप्राप्तीकडे या मोफत मराठी भाषेतून युवक-युवतींसाठी शेअर बाजार कार्यशाळा व चर्चासत्रचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक बोरुडे बोलत होते. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, रामदास सोनवणे, कवी सुभाष सोनवणे, कार्यशाळेचे मार्गदर्शक कुणाल जगताप, उद्योजक तथा चर्मकार विकास संघाचे युवा प्रदेश कार्याध्यक्ष अमोल बोर्‍हाडे, प्रतिष्ठानचे राजेंद्र धस, युवक अध्यक्ष ऋषीकेश आंबेकर, गणेश एडके, चर्मकार वधू-वर मेळावा समितीचे उपाध्यक्ष रामदास गाडेकर, रविदासिया चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संदीप सोनवणे, गोपीनाथ गाडे महाराज, प्रदीप कांबळे, कारभारी वाकचौरे, संतोष जाधव, रेणुका साळवे, भारत चिंधे, सुरेश एडके, आरती एडके, सोपान कदम, भरत कदम, भूषण नाचणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. संजय खामकर यांची अखिल भारतीय रविदासीया धर्म संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर संघटनेच्या आय.टी. प्रमुखपदी प्रशांत पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविकात गणेश एडके यांनी कोरोनाच्या संकटकाळात सर्वांना आरोग्य व पैश्याचे महत्त्व पटले. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र शेअर बाजारात गुंतवणुक करणार्‍यांनी चांगल्या प्रकारे घरी बसून पैसा कमवला. साईड बिजनेस म्हणून आपल्या आर्थिक उत्पन्नातील थोड्या प्रमाणातील रक्कम यामध्ये गुंतवणुक केल्यास भविष्यात त्याचे फळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय खामकर म्हणाले की, चर्मकार समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील युवक अर्थसंपन्न होऊन समाजाचा विकास साधण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण, नोकरी व व्यवसायाबरोबर युवकांनी शेअर बाजारमध्ये उतरण्यासाठी त्यांना योग्य ज्ञान देण्याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेअर बाजारबद्दल मार्गदर्शनवर कुणाल जगताप म्हणाले की, पैसे गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट सर्वोत्तम पर्याय असून, याकडे मराठी बांधव लक्ष देत नाही. पैसे साचवण्यापेक्षा पैश्यातील काही हिस्सा शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यास भविष्यात त्याचा परतावा चांगला मिळू शकतो. शेअर बाजारबद्दल काही गैरसमज असल्याने याकडे युवक वळत नाही. तर जे युवक याकडे वळतात त्यांना पुरेसा ज्ञान नसल्याने त्यांचे नुकसान होते. कोरोनानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास अनेक संधी निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तर व्याख्यानात त्यांनी सेन्सेक्स, निफ्टी, मनी व रिस्क मॅनेजमेंट, चार्ट कसा पहावा? आदी शेअर मार्केटची सखोल माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन केले. नवीन लोकांनी शेअर मार्केटमधून झटपट पैसे कमवण्याआधी ते ज्ञान आत्मसात करण्याकडे लक्ष दिल्यास यशस्वी होता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेसाठी संपुर्ण जिल्ह्यातून युवक-युवतींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कोरोना नियमांचे पालन करुन ही कार्यशाळा पार पडली.