आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी हॅपीस्कूलचा प्रकल्प दिशादर्शक -ओमप्रकाश मोतीपावळे

लहान मुले उद्याच्या सक्षम भारताचे भविष्य आहेत. कोरोना काळात आदिवासी भागातील मुले शिक्षणापासून दुरावली आहेत. या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना प्रवाहात आनण्यासाठी रोटरी प्रयत्नशील आहे. यासाठी रोटरीने आदिवासी भागात साक्षरता सुधारणा अभियानातंर्गत सुरु केलेला हॅपीस्कूलचा प्रकल्प दिशादर्शक व काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रोटरी 3132 चे जिल्हा प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपावळे यांनी केले.


रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने हॅपीस्कूल प्रकल्पाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील बेलपंढरी या आदिवासी भागातील अंगणवाडीस कपाट, टेबल, खुर्ची, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर मशीन, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांसाठी गणवेश, शालेय बॅग, चप्पल, डबा, पाणी बॉटल, पाटी, पेन्सिल, वैयक्तिक स्वच्छतेचे सर्व साहित्य तसेच पौष्टिक आहारची भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मोतीपावळे बोलत होते. यावेळी डिस्ट्रिक्ट लिट्रसी डायरेक्टर संजय घुले, रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा शशी झंवर, सचिव देविका रेळे, प्रकल्प समन्वयक डॉ. बिंदू शिरसाठ आदी रोटरीच्या सदस्या उपस्थित होत्या.
संजय घुले म्हणाले की, कोरोना महामारीत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या मुलांचे जीवन अंधकारात सापडले असून, त्यांना प्रकाशवाट दाखविण्यासाठी रोटरी हॅपीस्कूल प्रकल्प राबवित आहे. रोटरीच्या सरव्ह टू चेंज लाईफ या ध्येयाने आदिवासी दुर्गम भागात साक्षरता होण्यासाठी प्रकाशाची ज्योत पेटविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प समन्वयक डॉ. बिंदू शिरसाठ यांनी हास्यस्कूल प्रकल्पाची माहिती दिली. या उपक्रमास रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा झंवर यांची कन्या हर्षिता झंवर हिने हातभार लावला. मानसतज्ञ आदिती यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी समाज विकास समितीच्या सिस्टर बिंदू व अंगणवाडी शिक्षिका वैशाली झिंझुर्डे यांनी परिश्रम घेतले. सचिव देविका रेळे यांनी आभार मानले.