बलात्कारामधील आरोपीची उमेदवारी जाहीर केल्याच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या प्रतिमेस महिलांचे जोडे मारो आंदोलन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या आरोपीस उमेदवारी जाहीर केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सर्जेपूरा कराचीवालानगर येथे झालेल्या या आंदोलनात आरपीआय महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अलका बुरुडे, संपदा म्हस्के, शकीला शेख, स्मिता गायकवाड, ममता चौधरी, सुरैय्या शेख, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, नईम शेख, अजीम खान, विजय शिरसाठ, जावेद सय्यद, सुयोग बनसोडे, अभिजित पंडित, उमेश गायकवाड, आकाश सोनवणे आदी सहभागी झाले होते. पिडीत महिलेचे नांव निवेदनात नमुद करुन ते सोशल मिडीयावर व्हायरल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने यावेळी करण्यात आली.
गोविंद अण्णा मोकाटे यांनी एका मागासवर्गीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महिलेला न्याय मिळण्याअगोदरच राजकीय दबाव आणून आरोपीला पाठिशी घालण्याचे काम केले जात असून, आरोपी फरार असताना या आरोपीची जिल्हा परिषद निवडणुसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी उमेदवारी जाहीर केल्याचा निषेध नोंदविण्यासाठी आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
सुशांत म्हस्के म्हणाले की, बलात्कारी आरोपीस उमेदवारी जाहीर करुन, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने मागासवर्गीय समाजबांधवांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राजकीय पुढारी आरोपीला पाठिशी घालण्याचे काम करत असल्याने महिलेला न्याय मिळण्यास उशीर होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन राजकारण करणार्‍यांनी त्यांचे विचार अंगी बाळगून बलात्कारी आरोपीला पाठिशी घालू नये. आरपीआयने घोषित केलेले जोडो मारो आंदोलन तृतीय पंथीयांच्या वतीने केले जाणार होते. मात्र त्यांच्यावर देखील दबाव आणून त्यांना घाबरवण्यात आल्याने ते आंदोलनात सहभागी झाले नाही. पिडीत महिला न्याय मिळण्यासाठी आरपीआय ठामपणे उभी आहे. आरोपीच्या पत्नीने आमच्यावर पैसे मागितल्याचा खोटा आरोप केला आहे. पैसे मागितले असल्यास त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. या प्रकरणात आरोपीच्या पत्नीने पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून पिडीत महिलेचे नांव सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यामुळे सदर महिलेची समाजात मोठी बदनामी झाले आहे. तिचे जीवन जगणे कठिण झाले असून, लैंगिक शोषणच्या गुन्ह्यात पिडीत महिलेचे नांव गुप्त ठेवण्यात येते. मात्र आरोपींच्या समर्थकांनी पिडीत महिलेचे नांव जाणीवपुर्वाक बदनामी होण्याच्या उद्देशाने व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन पिडीत महिलेचे नांव व्हायरल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच आरोपीला अटक न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालया समोर पिडीत महिलेसह उपोषण करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.