महापालिका अधिकाऱ्यांनी विकला भूखंड

बोल्हेगाव येथील साईराज उपनगरमधील सर्वे नंबर 68/1/3/4 क्षेत्रांमधील 44 गुंठ्यात महापालिकेचा हक्काचा ओपन स्पेस आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यवसायकाशी हात मिळवणी करून हा ओपन स्पेस विकल्याचा गंभीर आराेप राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी केला. वाकळे यांनी स्थानिक नागरिकांसह आयुक्तांशी भेट घेऊन त्यावर सविस्तर माहिती आणि निवेदन दिले. या प्रकाराची चाैकशी हाेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

या भागातील रहिवाशांच्या हक्काचा ओपन स्पेस असताना या अधिकाऱ्याने महापालिकेच्या हक्काच्या जागेत मोठा भ्रष्टाचार केला आहे. या ओपन स्पेसमध्ये महापालिकेचे अधिकृतपणे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. असे असताना हा ओपन स्पेस अनधिकृत कसा झाला. बांधकाम व्यवसायिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रिवाईस प्लॅन मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे हे बांधकाम व्यवसायिक नागरिकांना धमकावत आहेत. या ठिकाणी उभे असलेले मंदिरे व सांस्कृतिक भवन पाडण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने यात लक्ष घालून ओपन स्पेस लुबाडला जाऊ देऊ नये, अशी मागणी नगरसेवक वाकळे यांनी केली.

शेषराव बडे, मोहन पडोळे, गोरख खाडे, गहिरीनाथ बडे, मुरलीधर सुळे, ज्ञानदेव जायभाये, नंदा आंधळे, सविता अडसूळ, अनिता सोनवणे, संध्या दिवटे, मनीष नाकडे आदी उपस्थित होते.