शिक्षकेतर कर्मचार्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानूसार महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हे होऊ घातलेल्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यासाठी सोमवार (दि.२० फेब्रुवारी) पासून बेमुदत काम बंद सुरु करण्यात आले आहे. प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे यांनी दिली.
न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज समोर काम बंद आंदोलन करुन शिक्षकेतर कर्मचार्यांनी निदर्शने केली. या आंदोलनात बबन साबळे, हेमा कदम, वंदना लाहोर, सविता डांगे, रवी वर्पे, सिताराम मुळे, दत्तात्रय जाधव, भानुदास गुंजाळ, शिवाजी बोरुडे, प्रशांत घोडके, विजय म्हस्के, सुरेश शिंगणे, रुपेश शिंदे, दत्तात्रय हिरणवाळे, अशोक कदम, दादा आगळे, बाबासाहेब वाघुले, योगेश शेळके, चेतन साळवे, विलास लांघी, गोकुळ फलके, श्रीराम बनसोड, रविंद्र बुधवंत, दिगंबर भडकवाड, दिपक विराट, संजय शिंदे, संतोष बुगे, मनोज पवार, जगदिश कोंगे आदींसह न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, पेमराज सारडा, राधाबाई काळे, लॉ कॉलेज, अहमदनगर कॉलेज आदी जिल्ह्यातील सर्व अनुदानित व अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
परीक्षा कामकाजावर बहिष्कार, निदर्शने काळ्याफिती लावून काम करणे, एक दिवसाचा लक्षणीक संप, या पद्धतीने आंदोलनाचे टप्पे करीत शासनाचे लक्ष वेधले, परंतु अपेक्षित निर्णय न झाल्याने बेमुदत काम बंद करण्यात आले असल्याचे यावेळी संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित दोन बैठका झाल्या होत्या. त्यावेळी संयुक्त कृती समितीला सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. या बैठकीतील इतिवृत्त आणि लेखी आश्वासन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. परंतु शासनाने दिलेल्या इतिवृत्तात मागण्या मान्य केल्याची स्पष्ट नोंद घेतलेली नाही. म्हणून बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. सरकारकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत कृती समितीने विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर सर्व कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देत आंदोलन सुरू आहे.