पुलाने भक्ती मार्ग जोडावा

पालक मंत्र्यांकडे, महंत उद्धव महाराजांची मागणी

सोनई, सुरेगाव गावातून नेव्हर या गावच्या परिसरातील भक्तांना येण्या-जाण्यासाठी येथील गोदावरी नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी सद्गुरु नारायण गिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातील भक्तांना तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी 40 किलोमीटरचा मोठा वळसा मारून यावे लागत असल्याने दोन्ही तालुक्यांतील ग्रामपंचायतीने पुलाच्या कामासंबंधी ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नेवासे तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिर, मोहिनीराज मंदिर, खंडोबा, म्हाळसादेवी मंदिर, नारद मुनी मंदिर, नारायणगिरी आश्रम, संत तुकाराम महाराज मंदिर, विश्वेश्वर नाथबाबा, काशी विश्वेश्वर व मधमेश्वर मंदिर आहे. प्रसिद्ध देवगड संस्थान व शनी शिंगणापूर येथील शनीमंदिर आहे. गोदावरी नदीकाठी पुरातन सिद्धेश्वर व संकटेश्वर मंदिर आहे. नेवरे गाव हे राष्ट्रभक्त संघ सेवक प्रल्हाद अभ्यंकर यांचे गाव असून गंगापूर, वैजापूर, येवला तसेच कन्नड भागातील अनेक पायी दिंड्या नेवासे तालुक्यात महिन्याच्या एकादशीला येतात. या भक्तांना नदीवर पूल नसल्याने 40 किलोमीटरचा वळसा मारून यावे लागते, असे या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे, भक्ती मार्ग सुरू व्हावा, यासाठी महंत उद्धव महाराज यांनी मंत्रालयात जाऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न समजावून सांगितला. सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी निश्चित मार्ग काढण्यात येईल. असे विखेपाटील यांनी आश्वासन दिले.