आता गॅस लाईनमुळे रखडणार शहरातील 338 रस्त्यांची कामे
मनपाने बीजीआरएल कडून खोदायीसाठी नव्याने प्रस्ताव मागवला
नगर शहरात सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची रस्त्यांची कामे प्रस्तावित असली तरी, या कामांच्या ठिकाणी आधी गॅस पाईपलाईन टाकण्याचे नियोजन मनपाकडून सुरू करण्यात आले आहे. शहरातील चार प्रभागांमध्ये कामे प्रस्तावित असलेल्या 136 किमी रस्त्यांच्या खोदाईसाठी मनपाने नव्याने प्रस्ताव मागवला आहे. त्यात रस्ता खोदायी शुल्काचा तिढाही कायम आहे. परिणामी खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना चांगल्या रस्त्यांसाठी आणखी काही महिने प्रतीक्षाच करावी लागणार आहे. आचारसंहितेमुळे निवडणुकीपूर्वी शहरात मंजूर झालेली सुमारे 280 कोटींची कामे ठप्प आहेत. आचारसंहिता शिथिल झाल्याने निविदा मंजूर करून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काही रस्त्यांची कामे मार्गी लावण्याची तयारी राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. मात्र बहुतांश प्रस्तावित रस्त्यांच्या जागी काम सुरू करण्यापूर्वी गॅस पाईपलाईनचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने भारत गॅस रिसोर्सेसला पूर्वीच्या प्रस्तावानुसार सहा, सात, आठ व नऊ या चार प्रभागात 81 किमी व रस्ते प्रस्तावित असलेल्या ठिकाणी 55 किमी अश्या 136 किमी रस्त्यांवर खोदाईसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान मनपा प्रशासनाने शासन आदेशानुसार नव्याने खोदायी शुल्क निश्चित केले आहे. मात्र कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चार प्रभागातील खोदायी मात्र आता रखडली आहे.
गॅस लाईनमुळे नगर शहरातील सात प्रमुख रस्त्यांची कामे रखडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये माऊली संकुल ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय, केडगाव लिंक रोड ते जे एल पी रेसिडेन्सी ते पुणे महामार्ग, अष्टविनायक अपार्टमेंट, टेलिफोन ऑफिस ते पारिजात चौक ते एकविरा चौक ते सिटी प्राईड ते तपोवन रस्ता, पाऊलबुद्धे शाळा ते शिरसाठ मळा ते सिटी प्राईड हॉटेल, माळीवाडा ऑफिस ते माणिक चौक ते भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक, पेशवाईपर्यंत, पत्रकार चौक, लाल टाकी ते न्यू आर्ट्स महाविद्यालय आणि जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान ते आनंदी बाजार ते गाडगीळ पटांगण पासून अमरधाम पर्यंत आहे.