‘लाडकी बहिण’च्या अर्जासाठी पैसे घेणाऱ्या सोलापुरातील दोन नेट कॅफेंवर गुन्हे दाखल
मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही लूट सुरूच
सोलापुर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लाभार्थींकडून सोलापुरात शुल्क घेणाऱ्या सात रस्ता परिसरातील दोन नेट कॅफे चालकांवर शनिवारी रात्री सदर बाजार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेत महिलांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तरीही लुटीचे प्रकार सध्या सुरूच असल्याने या घटनेमुळे समोर आले आहे. दोन्ही कॅफे अधिकृत महासेवा केंद्र नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही नेट चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 318 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहे. मंडळ अधिकारी सारिका कल्याण मावळ यांनी फिर्यादी दरम्यान जिल्ह्यातील कोणत्याही महा-ई-केंद्रावर शुल्क घेऊ नये. असे आदेश देण्यात आले आहेत.