आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शन सुरू

आषाढी यात्रेनिमित्त रविवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरू करण्यात आले आहे. येत्या २६ जुलै पर्यंत विठ्ठलाचे 24 तास मुखदर्शन व 22 तास 15 मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहील. दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांचे होणारी गर्दी पाहता यात्रा कालावधीत जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल दर्शन मिळावे. यासाठी चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी रविवार 7 जुलै पर्यंत चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे 24 तास मुखदर्शन तर 12 तास 15 मिनिटे तास पदस्पर्श दर्शन सुरू राहील. असे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती, नित्य पूजा सुरू राहतील. 26 जुलै रोजी प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध राहील. श्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सदस्य पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.