महावितरणाच्या नावाने फसवणुकीचा नवा फंडा

बळी न पडण्याचे महावितरणाचे आवाहन

‘प्रिय ग्राहक, तुमचे वीज बिल अपडेट नसल्यास आज रात्री साडेनऊ वाजता तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित न होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.’ असे बनावट संदेश नागरिकांना येत आहे. या माध्यमातून महावितरणाच्या नावाने फसवणुकीचा नवा फंडा सुरू झाला आहे. अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या फसव्या संदेशाला ग्राहकांनी बळी पडू नये. असे आवाहन महावितरणाने केले आहे. वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे बनावट मेसेज पाठवण्यात येत आहे. एखाद्या ग्राहकाने संपर्क साधला तर वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते, त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याचे दाट शक्यता आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी, अशा बनावट मेसेजकडे पूर्ण दुर्लक्ष करावे. असे सांगण्यात आले आहे. महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच सिस्टीम द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास, तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी, तसेच दरमहा वीज बिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठवण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीज बिलाची रक्कम, वीज पुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती एसएमएस द्वारे पाठवण्यात येत असते.अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या फसव्या संदेशाला ग्राहकांनी बळी पडू नये.असे आवाहन महावितरणाने केले आहे.