राज्यातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांना आयोगाने परवानगी नाकारली
अध्यापकांची अपुरी संख्या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नकार
वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील विविध 10 जिल्ह्यात महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला अर्ज केला होता. मात्र आयोगाने अंतिम तपासणीत मुंबईतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली. आणि नऊ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी नाकारली आहे. अध्यापकांची अपुरी संख्या, पायाभूत सुविधांचा अभाव आणि आधार सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली कार्यरत नसणे ही त्यामागची प्रमुख लक्षणे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे 25 वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत आहे. येत्या वर्षी गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ आणि मुंबई या जिल्ह्यात आणखी 10 महाविद्यालय सुरू करण्यात येणार होते. गेल्या महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या तज्ञांच्या समितीने विविध महाविद्यालयात तपासणी केली. त्यावेळी सदस्यांना कमतरता आढळल्याने शासनाच्या नऊ महाविद्यालयांना परवानगी नाकारल्याचे पत्र ४ जुलै रोजी पाठवण्यात आले. वैद्यकीय शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वैद्यकीय महाविद्यालयांची परवानगी नाकारली, त्या महाविद्यालयांना पुन्हा अपिलात जाण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र काही महाविद्यालयांची परिस्थिती इतकी बिकट आहे की, आयोगाच्या मानांकनानुसार अध्यापकांची संख्या उपलब्ध असणे कठीण आहे. केवळ येत्या काळात ही पदे भरू या हमीवर कॉलेजेस परवानगी देतील की नाही? हे आत्ताच सांगणे मात्र अवघड आहे.