आरटीईचे प्रवेश रखडल्याने पालकांशी द्विधा मन:स्थिती
जिल्ह्यातून दहा हजार अर्ज; शाळा सुरू, मात्र होईनात प्रवेश
अहमदनगर : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आरटीईतून होणारी मोफत प्रवेश प्रक्रिया रखडल्याने आणि दुसरीकडे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना होत आल्याने आरटीई अर्ज केलेल्या पालकांची द्विधा मनस्थिती झाली आहे. नगर जिल्ह्यात असलेल्या 3000 जागांसाठी सुमारे दहा हजार अर्ज आले आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. राज्यातील लाखो पालक आरटीई कायद्यान्वय 25% राखीव जागांसाठी होणाऱ्या प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत. राज्यशिक्षण विभागाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलांमुळे काही सामाजिक संघटना व पालकांनी न्यायालयाचेदार ठोठावले. त्यामुळे न्यायालयाने या बदलावर स्थगिती दिली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने पुन्हा नव्याने ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली. याचा लकी ड्रॉ सात जून 2024 रोजी काढला. या सोडतीचा निकाल 12 जून रोजी न्यायालय निकालानंतर जाहीर होणार होता. परंतु काही कारणास्तव ही न्यायालयीन सुनावणी 11 जुलै पर्यंत पुढे ढकलली. या न्यायालयीन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू झाले. त्यालाही आता महिना होत आला. त्यामुळे नियमित प्रवेश प्रक्रिया उरकून वर्गही सुरू झाले आहेत. दुसरीकडे आरटीई प्रवेश प्रक्रियेत आपल्या पाल्याला संधी मिळेल या आशेने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश अद्याप कोठेही घेतलेले नाही. पाल्याची प्रवेशाची संधी दोन्हीकडून हुकली, तर त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल. अशी भीती सध्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे. 300 शाळांमधून 3000 जागांवर आरटीई प्रवेशासाठी सुमारे 10,000 अर्ज आले आहेत. त्यांची सोडतही राज्यस्तरावर सात जूनला झालेली आहे. येत्या काही दिवसात यावर तोडगा निघाला नाही तर अर्ज केलेल्या पालकांची काळजी वाढणार आहे. सोडत होऊनही केवळ 30% अर्जदारांनाच प्रवेश मिळणार आहे. सोडतीत नाव नसणाऱ्या 70 टक्के अर्जदारांना मात्र नियमित प्रवेशासाठीच प्रयत्न करावे लागतील. उशिरा त्यांनाही प्रवेश मिळतील का? तसेच प्रवेश मिळाला नाही तर? वर्ष वाया जाणार का? असे प्रश्न सध्या पालकांना पडलेले आहेत.