शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात
सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ काचपेटी
सातारा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे मुंबईहून साताऱ्यात आज दुपारी सुरक्षित दाखल झाली आहेत. ही वाघनखे येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेठेत ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेटप्रूफ काचपेटी तसेच मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेन्सर आदी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस व बाहेरच्या एजन्सीकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही वाघनखे सात महिने सातारकरांना पाहता येणार आहेत. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराला छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून तीन वर्षांसाठी भारतात आणले आहेत. ही वाघनखे आज बुधवारी सकाळी विशेष विमानाने मुंबईला दाखल झाली. व येथून सातारा पोलीस व पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून दुपारी साताऱ्यात आणण्यात आली. ही वाघनखे येथे लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. याच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ काचेच्या पेटी ठेवण्यात आली असून, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. इंग्लंडहून विशेष विमानाने वाघनखे महाराष्ट्रात आली. तेथून ती सुरक्षितपणे साताऱ्यात दाखल झाली. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच लंडनचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख कोलास मर्चंड हे देखील सोबत असतील. या वाघनखांसोबत ब्रिटनच्या म्युझियममधील एक केअर टेकर आला असून तो वाघनखांची सर्व काळजी घेणार आहे. या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.