महसूल संपाबाबत 23 जुलैला होणार बैठक

मराठवाड्यात प्रमाणपत्रांचे वितरण ठप्प

हिंगोली : राज्यात सुधारित आकृतीबंधाच्या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी मागील पाच दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात 23 जुलैला मंत्रालयात आयोजित बैठकीनंतर तोडगा निघण्याची शक्यता सध्या वाटते आहे. तूत्तास आंदोलन सुरूच असल्याने प्रमाणपत्र वाटपाचे काम ठप्प झालेले आहे. राज्यात महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करून, रिक्त पदे भरावीत यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी 15 जुलैपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात राज्यातील 9000 कर्मचारी सहभागी झाले आहेत. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या काम बंद आंदोलनामुळे महसूल पातळीवरून प्रमाणपत्रांचे वाटप सध्या ठप्प झालेले आहे. दांगट समितीच्या शिफारसीनुसार आकृतीबंध मंजूर करून, रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरावीत. ही आमची मागणी आहे. याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची भेट घेतली असून 23 जुलैला बैठक आहे. असे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष जीवन आहेर यांनी सांगितले आहे.