आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट नियमामुळे यावर्षीची आषाढी वारी ठरली आरोग्य वारी
आरोग्य विभागाचा नवीन विश्वविक्रम
पंढरपूर : महाराष्ट्र राज्याचा आरोग्य विभाग आणि भैरवनाथ शुगर्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून आषाढी यात्रेत सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात गुरुवारपर्यंत 14 लाख 28 हजार 120 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली गेली. त्यामुळे यंदा आरोग्य विभागाने नवीन जागतिक विक्रम नोंदवताना आपलाच मागील आषाढी वेळेचा रुग्ण तपासणीचा विक्रम मोडीत काढला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत यांनी दिली आहे.या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यापासून आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांना आरोग्य सेवा वेगवेगळ्या ठिकाणी दिली जात आहे. पंढरपूरमध्ये गोपाळपूर रोड, 65 एकर मैदान, तीन रस्ता चौक या तीन ठिकाणी आणि वाखरी पालखी तळ येथे एक अशा चार ठिकाणी यंदा महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. वाखरी पालखी तळ येथील आरोग्य शिबिराची सुरुवात 14 जुलै रोजी करण्यात आली. 14 ते 17 जुलै हे चारही दिवस भाविकांनी या आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. तर 65 एकर येथील शिबिरात सर्वाधिक भाविकांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्यात आले. याशिवाय तीन रस्ता गोपाळपूर येथील आरोग्य शिबिरात सर्व रोगांवर तपासणी औषधोपचार केले जात आहे. उपचार घेण्यासाठी वारकऱ्यांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.