शिवाजी महाराजांची वाघनखे आजपासून साताऱ्यामध्ये, सर्वांना पाहता येणार
सातारा : अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे शनिवारपासून सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहेत. राज्य सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युसियममधून तीन वर्षांसाठी आणलेली ही नखे दोन दिवसांपूर्वी सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली होती. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराजे यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी मोठ्या आवाजात उत्साहात शासकीय निवासस्थान ते श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशी रॅली काढण्यात आली. शनिवारपासून पुढील सात महिने सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत ही वाघनखे सर्वांना पाहता येणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन तिकीट घेता येईल. एका वेळी 200 पेक्षा जास्त लोकांना हे प्रदर्शन पाहता येणार नाही. त्यासाठी दिवसभर चार स्लॉट पाडण्यात आलेले आहेत. पहिला स्लॉट हा विद्यार्थ्यांसाठी मोफत असेल. दुपारी एक नंतर नागरिकांना नाममात्र शुल्कात प्रदर्शन पाहता येईल. या वाघनखांची रुंदी ही 9.5 सेंटीमीटर इतकी असून वागणकांची लांबी 8.6 सेंटीमीटर इतकी आहे.