बंदी असूनही माळशेजच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी

आळेफाटा : पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांसह माळशेज घाट पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली असताना बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. माळशेज घाटातील धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. पिंपळगाव, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट परिसरात पर्यटक आपला जीव धोक्यात घालून धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर तोबा गर्दी करत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने माळशेज घाट, धबधबे आणि मनमोहक दृश्यांचे जिल्ह्यातील नव्हे तर इतर शहरातील पर्यटकांना सुद्धा भुरळ पडत असते. त्यामुळे पर्यटकांचा ओढ माळशेज घाट परिसरात पर्यटन स्थळाकडे मोठ्या प्रमाणात असतो. पिंपळगाव, जोगा धरण क्षेत्राच्या परिसरात आणि पर्यटन स्थळावर सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी मोठी गर्दी सध्या व्हायला लागलेली आहे. पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, धबधबे, भीमाशंकर आणि माळशेज घाट अशा सर्व पर्यटन स्थळांसाठी 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असले तरी, धोकादायक ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात जात आहे. माळशेज घाटातील धबधब्याऊन पाणी वाहू लागल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली आहे, याशिवाय माणिकडोह, हडपसर, चावंड, शिवनेरी, हरिश्चंद्रगड, नारायणगड, आंबोली, नाणेघाट, खिरेश्वर, माळशेज घाट परिसरात पावसाने बऱ्याच ठिकाणी तयार केले आहे. काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील चार ते पाच जण वाहून गेल्याच्या धर्तीवर प्रशासनाने 31 जुलैपर्यंत म्हणजे पावसाच्या कालावधीत अशा पर्यटन स्थळांवर बंदी घातलेली असूनही पर्यटकांची अशा स्थळांवर होणारी गर्दी ही अनेक धोक्यांना पुन्हा आमंत्रण देऊ शकते.