पूजा खेडकर प्रकरणावर अखेर कडक कारवाई

अवघ्या दोन महिन्यातच आयएएस पदावरून हकालपट्टी

पुणे : वाशिमच्या वादग्रस्त परिवीक्षाधीन सहायक योजना अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्यावर अखेर यूपीएससीने कारवाई करत त्यांची अवघ्या दोन महिन्यातच आयएएस पदावरून हकालपट्टी केली आहे. दिव्यांग व नॉन क्रिमी लेयरचे बोगस प्रमाणपत्र देऊन ही फसवणूक केली गेली होती. त्यामुळे आता त्यांचे आयएएस पद कायमस्वरूपी बरखास्त करण्यात आले. तसेच पुढे यूपीएससी परीक्षेत बसण्यासही त्यांना बंदी घालण्यात आली आहे. यूपीएससी 2022 च्या परीक्षेत दिव्यांग व ओबीसी नॉन क्रिमी लेयर कोट्यातून आयएएस बनलेल्या पूजा यांचे सर्वप्रथम पुण्यात नियुक्ती झाली होती. मात्र प्रशिक्षणाच्या कालावधीतच त्यांनी जे कारणामे केले, त्यामुळे त्यांना दोन महिन्यातच त्यांचे पद गमवावे लागले आहे. पूजा खेडकर यांचे बनावट प्रमाणपत्राचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे यूपीएससीच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्त्यामुळे यूपीएससीने 2009 ते 23 पर्यंत निवड झालेल्या पंधरा हजाराहून अधिक उमेदवारांची सर्व कागदपत्रे तपासली. पूजा खेडकर यांच्याशिवाय इतर एकाही उमेदवाराच्या कागदपत्रात दोष आढळला नसल्याचे यूपीएससीने स्पष्ट केले आहे. यापुढे यूपीएससीतील निवड प्रक्रिया आणखी मजबूत आणि पारदर्शी करण्यावर आयोग भर देणार आहे. असेही सांगण्यात आले.