अकोले, ता.२ : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणात वेगाने आवक होत आहे. शुक्रवारी (ता.२) सायंकाळी ६ वाजता १० हजार ५२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. त्यामुळे जलसंपदा विभागाने तांत्रिकदृष्ट्या धरण भरल्याचे जाहीर केले. आढळा जलाशय १०० टक्के भरल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात उशिरा पाऊस सुरू झाला. मात्र,पाऊस टिकून राहिल्याने ओढे-नाले ओसंडून वाहत होते. धरण भरणार की नाही असा संभ्रम असताना,पावसाने जोरदार मुसंडी मारली. धरणात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने, जलसंपदा विभागाने तांत्रिकदृष्ट्या जलाशय भरल्याचे सांगितले आहे. तसेच ४ ऑगस्टला सकाळी राष्ट्रवादीचे युवा नेते अमित भांगरे,सुनीता भांगरे,दिलीप भांगरे आदी जलाशयात साडी-चोळी अर्पण करून जलपूजन करणार, असे तालुका अध्यक्ष सुरेश गडाख यांनी सांगितले.
‘आढळा १०० टक्के’
अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील ३९१४ हेक्टरचे सिंचन करणारा देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. १०६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेचा हा मध्यम प्रकल्प शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरल्याची अधिकृत माहिती जलसंपदाचे अभियंता रजनीकांत कवडे यांनी दिली. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पात पूर्वीचाच ३६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता.