लाडक्या बहिणींना उपकार म्हणून नव्हे, तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे -निलमताई गोऱ्हे
महिलांना सन्मान मिळवून देणाऱ्या त्या भावाला पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्वसामान्य वर्गातील नागरिकांच्या घरात आनंदाचा शिधा उपलब्ध करुन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले. तर कुटुंबातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपयांचे आर्थिक लाभ देऊन त्यांचा सन्मान वाढविण्याचे काम केले आहे. या योजनेत काही त्रुटींमुळे फक्त एक टक्के अर्ज नाकारण्यात आले. जास्तीत जास्त राज्यातील भगिनींना या योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. लाडक्या बहिणींना पैसे उपकार म्हणून नव्हे, तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व लाभार्थी महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरात गुरुवारी (दि.22 ऑगस्ट) टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, माजी महापौर शिलाताई शिंदे, नगरसेविका अश्विनी जाधव, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख उज्वलाताई भोपळे, शोभाताई अकोळकर, जिल्हाप्रमुख डॉ. शबनम इनामदार, मीराताई शिंदे, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, शहर प्रमुख सचिन जाधव, युवा सेना शहर प्रमुख महेश लोंढे, आकाश कातोरे, अभिषेक भोसले, युवा सेना संपर्कप्रमुख अमोल हुंबे, शहरप्रमुख पुष्पाताई येळवंडे, अजित दळवी, सचिन ठोंबरे, सोमनाथ शिंदे, दामोदर भालसिंग, विशाल शितोळे, वैद्यकिय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, काका शेळके, भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, पोपट पाथरे, आशिष मुनोत, बंडू रोहोकले, अक्षय भिंगारे, सुनिल भिंगारदिवे, आशिष (मुन्ना) शिंदे, अक्षय शिंदे, गौरव शिंदे, चैतन्य राणे, अक्षय कोंडावार, प्रथमेश भापकर, दादा कांबळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे निलमताई गोऱ्हे म्हणाल्या की, महिलांनी मिळालेल्या पैशाचा योग्य उपयोग करा. या पैश्यातून घरातील आवडीचा वस्तू महिला आपल्या मर्जीप्रमाणे घेऊ शकणार आहे. तर हे पैसे औषधोपचारासाठी किंवा मुलांच्या विविध शैक्षणिक गरजांसाठी उपयोगी पडणार आहे. महिलांचा सन्मान वाढविणारी ही योजना आहे. दिलेले पैसे सरकार परत घेणार नाही, हे पैसे बँकेत सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.
महिलांनी मानसिकता बदलून पुढे जायचे आहे व एकजुटीने काम करायचे आहे. मुली झालेल्या मातेला टोमणे मारले जातात. मुलगी झालेल्या मातेचा सन्मान वाढवण्यासाठी भविष्यात माँ साहेब मीनाताई ठाकरे मातृत्व योजना राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
लाडक्या बहिणींच्या पाठीमागे भाऊ सक्षमपणे उभा राहिला आहे. या भावाला पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी लाडक्या बहिणी पुढाकार घेणार आहे. महिला घरातील राजकारण सर्वोत्तम हाताळतात. तेच राजकारण समाजात चांगल्या अर्थाने करण्यासाठी महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले आहे. या माध्यमातून विविध पदे महिला भूषवित आहे. समाजाच्या विकासासाठी महिलांचे मोठे योगदान मिळत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. तर आपल्या मुलींना कमी न लेखता त्यांच्याशी चांगले वागण्याचे त्यांनी महिलांना आवाहन केले. बँकेने या योजनेसाठी महिलांना सहकार्य न केल्यास त्यांची तक्रार प्रशासन किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे करण्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मेळाव्यासाठी शहरासह उपनगरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना अर्ज भरण्याची प्रक्रिया, पैसे खात्यात वर्ग झालेले नसल्याने पुढील कार्यवाही, विविध त्रुटी दूर करुन त्याची पूर्तता करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत स्वागत माजी महापौर शीलाताई शिंदे व नगरसेविका अश्विनी जाधव यांनी केले.
जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिवसैनिक कटीबद्ध आहे. महिलांच्या अडीअडचणी सोडण्याचे काम प्रत्येक पदाधिकारी करत आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा मान-सन्मान वाढला असून, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडी-अडचणी निर्माण झाल्यास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले. शहर प्रमुख सचिन जाधव यांनी या योजनेचा लाभ देताना राज्य सरकारने जातपात, धर्म बघितला नाही. सर्व समाजातील महिलांना त्याचा लाभ दिला आहे. जाणीवपूर्वक विरोधक निराशाजनक वातावरण निर्माण करत असून, या योजनेचा अपप्रचार करत आहे. महिलांच्या खात्यावर पैसे आल्याने विरोधकांच्या तोंडावर चपराक बसली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल शितोळे यांनी केले. आभार मीराताई शिंदे यांनी मानले.
–
अर्ज भरताना वाटले नव्हते पैसे येणार, मात्र रक्षाबंधनाच्या पूर्वीच खात्यात पैसे आल्याने चांगल्या प्रकारे रक्षाबंधनाचा सण साजरा करता आला. मुख्यमंत्री असलेल्या भावाकडून सर्व महिलांना ओवाळणी मिळाली आहे. महागाईच्या काळात मुला-मुलींचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह, ज्येष्ठांचा वैद्यकीय खर्च पेलवत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना आर्थिक सक्षम करुन त्यांचा सन्मान वाढविला आहे. हा भाऊ पुन्हा मुख्यमंत्री व्हावा! ही सदिच्छा लाभार्थी महिलांनी व्यक्त केली.