शिवरायांचं स्मारक कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा, समस्त शिवप्रेमींची मागणी!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यातच वादळी वाऱ्यामुळे कोसळला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट पसरली असून, शेवगाव येथे या घटनेचा निषेध करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींकडून करण्यात आली. मालवण येथील या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शेवगाव येथे शिवप्रेमींच्या वतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदार प्रशांत सांगडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अत्यंत घाईने पुतळा बसवण्यात आला. जो पुतळा पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षे लागली असती, तो अवघ्या सहा महिन्यांत तयार करून बसवण्यात आला. केवळ मते मिळविण्याकरता घाईघाईत छत्रपतींच्या पुतळ्याचे, निकृष्ट काम केल्याने अवघ्या आठ महिन्यांत पुतळा कोसळला. छत्रपतींनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो किल्ल्यांची उभारणी केली, त्यांचे दगड आजही शाबूत आहेत, मात्र छत्रपतींचा ५ कोटी रुपये खर्च करून बनवलेला पुतळा कोसळला. ही अत्यंत शरमेची बाब आहे. त्यामुळे पुतळा बसवताना उपस्थित असणारे मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री व संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.