गणेशोत्सवामध्ये डीजे वाजवल्यास होऊ शकते कठोर कारवाई !

गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी असून, तसे केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी दिला आहे. शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता कमिटी, प्रतिष्ठित नागरिक, वाद्यधारकांची बैठक सोमवारी सकाळी ११ वाजता झाली होती. यावेळी गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची स्थापनेपूर्वी घ्यायची कायदेशीर परवानगी, मंडप जागा, वीज कनेक्शन, स्वयंसेवक नेमणे, सीसीटीव्ही कॅमेरा लावणे व बॅनरबाबत नगरपरिषद/ग्रामंपचायतीचा ना हरकत दाखला घेणे, तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणेश विसर्जनाच्या सूचना, तसेच गणेश मूर्तीची विटंबना होणार नाही, याची काळजी व सार्वजनिक मंडळाचा देखावा तयार करण्यापूर्वी जातीय व धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, याबाबतच्या सुचना देऊन, तसेच सण-उत्सव काळात सोशल मीडियातून कुठल्याही धार्मिक भावना दुखावणार नाही, याबाबतच्या सुचना व मार्गदर्शन करण्यात आले. शेवगाव पोलिस स्टेशन हद्दीत शांतता राखण्याचे आवाहन सुनील पाटील यांनी केले.