बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणातील संशयिताचा मृत्यू
चौकशीसाठी पोलिस ठाण्यात लावली होती हजेरी
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणातील संशयित योगेश बनकर याला सोमवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले होते. प्राथमिक चौकशी करून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला पोलिसांनी सोडून दिले. दरम्यान, बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. योगेश बनकर रुग्णालयात शिपाई पदावर कार्यरत होता. पासवर्डचा गैरवापर करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप केल्याचा योगेश बनकर याच्यावर संशय होता. पोलिस त्याच्या शोधात होते. त्याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्जही केला होता. तो न्यायालयाने फेटाळल्याने पोलिसांनी बनकर याच्याशी संपर्क साधला. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस तो पसार होता, प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो परत आला. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविले होते. मंगळवारी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी योगेश बनकर याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्याची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले. त्यानंतर रात्री त्याचे निधन झाले. दुपारी तो व त्याचा भाऊ तोफखाना पोलिस ठाण्यात आले होते. त्याची पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. चौकशीदरम्यान बनकर याची प्रकृती ठिक नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झालेली होती. वरिष्ठांच्या परवानगीने पोलिसांनी आरोपीला नोटीस देऊन पहाटे दीड वाजेच्या सुमारास बनकर याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता पोलिसांना पुन्हा या प्रकरणातील आरोपी शोधण्यासाठी आपली पावले वेगळ्या दिशेने वळवण्याची गरज पडणार आहे.