रशियात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून मोदी रशियाला जाणार : द्वीपक्षीय चर्चा शक्य

रशियातील कजान येथे २२ आणि २३ ऑक्टोबरला होणाऱ्या ब्रिक्स गटाच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून शुक्रवारी देण्यात आली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून मोदी रशियाला जाणार आहेत. या परिषदेस चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हेही हजर राहणार आहेत.
शिखर संमेलनापूर्वी ब्रिक्स संघटनेतील सदस्य देशांच्या नेत्यांसोबत मोदी यांची द्वीपक्षीय चर्चा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मोदी यांनी याआधी जुलै महिन्यात रशियाचा दौरा केला होता. ब्रिक्स संघटनेत भारत, रशिया, चीन, ब्राझील, आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. तर अलीकडील काळात इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे देश “ब्रिक्स” चे सदस्य बनले होते. जगातील ४५ टक्के लोकसंख्या आणि २८ टक्के अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व ब्रिक्स संघटना करते. या परिषदेत विविध जागतिक तसेच प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.