प्रचारासाठी पाठवण्यात येणाऱ्या मोबाईल मेसेजची माहिती द्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत राजकीय प्रचारासाठी पाठवण्यात येणाऱ्या एकत्रित लघुसंदेशांची (बल्क एसएमएस) माहिती मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी निवडणूक यंत्रणेला द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, की निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांकडून बल्क एसएमएसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. माध्यमांवर कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जाऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीने परवानगी दिलेल्या जाहिरातीचे संदेश पाठविण्यात यावेत. बल्क एसएमएसची माहिती प्रत्येक विधानसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना किंवा एमसीएमसी समितीला द्यावी. मतदानाच्या आधीचे ४८ तासांचा कालावधी शांतता कालावधी असल्याने, या कालावधीत कुठल्याही प्रकारचे मेसेज प्रसारित होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना सालीमठ यांनी दिल्या.