अहिल्यानगर : नगर शहर विधान सभा निवडणूकीतून कोतकर परिवाराने माघार घेतली आहे. यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गेल्या वर्षभरापासून कोतकर हे विधान सभा निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र त्यांना काही कायदेशीर अडचणी आल्यानंतर संदीप कोतकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. पण आपल्या पत्नी माजी उपमहापौर सुवर्णाताई संदीप कोतकर याना उमेदवार म्हणून त्यांनी उभ केला होता मात्र त्यातही काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर करून आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात संदीप कोतकर यांनी पोस्टमध्ये काय सांगितलं आहे.
“प्रिय नगरकरांनो, गेल्या महिनाभरात घडत असलेल्या राजकीय घडामोडींकडे आपले लक्ष आहेच. बऱ्याच राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक घडामोडी घडून आल्या. आलेल्या विधानसभा निवडणुकीतून एक सक्षम पर्याय नगरकरांना देण्याचं एक स्वप्न आम्ही पाहिलं. नगरकरांचा विकास हा कोतकर परिवाराचा नेहमीच अजेंडा राहिलेला आहे. त्यातून माझ्या उमेदवारीचा विचार पुढे आला. परंतु, त्यात येत असलेल्या काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. त्यावर कार्यकर्ते आणि वरिष्ठांच्या आग्रहाने मा. उपमहापौर सौ. सुवर्णा संदीप कोतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मोठ्या ताकदीने जिंकण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी लढण्याची तयारी सुरु केली होती. कार्यकर्ते, जिवाभावाचे मित्र, सहकारी आणि मी ज्यांचे योगदान कधीच विसरु शकत नाही असा माझा भाऊ सचिनआबा आणि माझे पूर्ण कुटुंब यांनी प्रचंड परिश्रम केले. हे सगळं करत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्यांना तोंड देत जनसामान्यांच्या भेटी गाठी सुरु असताना काही तांत्रिक अडचणींमुळे सुवर्णा यांचाही अर्ज आज मागे घ्यावा लागला. ही माघार घेत असताना मनात एक निराशा आहे. परंतु हा शेवट नाही. ही सुरुवात आहे एक नव्या पर्वाची. गेली अनेक वर्ष वनवासात राहिलेलं कुटुंब पुन्हा जनसामान्यांच्या सेवेत येण्याची. इथून मागचा काळ तुमच्या साठीच होता. इथून पुढचा काळही तुमच्या सेवेसाठीच असेल. आपली लढाई ही नगरकरांच्या विकासासाठी होती आणि राहील. ती संधी आपण आम्हाला देत राहाल ही खात्री आहे.”