१२ विधानसभा मतदारसंघात १५१ जण निवडणूक रिंगणात!
अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५९ जणांपैकी १०८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १५१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत १२८ उमेदवार होते रिंगणात आताच्या निवडणुकीत २३ उमेदवार वाढले आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक मतदारसंघात बंडखोरांनी अर्ज कायम ठेवल्याने महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. उमेदवारी अर्जाच्या माघारीनंतर १२ विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अकोलेमध्ये ३ जणांनी माघार घेतल्याने ९ उमेदवार रिंगणात, संगमनेरात २ जणांनी माघार घेतल्याने १३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. शिर्डी मतदारसंघात ४ जणांनी माघार घेतल्याने ८ उमेदवार रिंगणात, कोपरगावात ७ जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार रिंगणात आहेत. श्रीरामपूरमध्ये १२ जणांनी माघार घेतल्याने १६ उमेदवार रिंगणात आहेत. नेवासे मतदारसंघात १२ जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार, शेवगाव-पाथर्डीमध्ये १२ जणांनी माघार घेतल्याने १५ उमेदवार, राहुरीत ११ जणांची माघार घेतल्याने १३ उमेदवार रिंगणात, पारनेर मतदारसंघात ८ जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार रिंगणात राहिले. अहमदनगर शहर मतदारसंघातून १० जणांची माघार घेतल्याने, १४ उमेदवार रिंगणात राहिले. श्रीगोंदेत १५ जणांची माघार घेतल्याने १६ उमेदवार रिंगणात, तर कर्जत-जामखेडमध्ये १२ जणांनी माघार घेतल्याने ११ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.