नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणार : आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर : शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या विश्वासाने मला निवडून दिले. शहर विकासाची महत्त्वाकांक्षा बाळगून नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी काम करणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदारपदी सलग तिसऱ्यांदा तब्बल ३९ हजार ६१८ मतांना विजयी झाल्याबद्दल स्नेहबध फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी आमदार संग्राम जगताप यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन केला. व त्यांना मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, शहरातील सर्वच भागात सिमेंटचे रस्ते झाले आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. सर्वांच्या सहकार्यातून शहराचा विकास होणार आहे. आता राहिलेली विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावून शहराच्या सौदर्यात भर घालू. औद्योगिकीकरण, व्यवसाय, उद्योगधंदे, तसेच शिक्षण क्षेत्राला चालना देण्यावरही भर राहील. सध्या शहरासह उपनगरात बहुतांश रस्त्यांचे कामे अंतिम टप्यात आहेत. नगरकरांनी या काळात सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे आभार. आमदार जगताप सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. ते मंत्री होणे हे समस्त नगरकरांसाठी अभिमानास्पद राहील, असे स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. शिंदे म्हणाले.