3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचा शासन आदेश निर्गमित करावा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी

थकबाकीसह वाढीव महागाई भत्ता जानेवारीच्या वेतनासोबत वितरित व्हावा -बाबासाहेब बोडखे

नगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे 1 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार तथा नागो गाणार व नागपूर विभागाचे कोषाध्यक्ष संतोष द. सुरावार यांनी सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे अत्यावश्‍यक व निकडीचे आहे. त्यामुळे 1 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता थकबाकी सह देण्याचा निर्णय राज्य शासनाने घोषित करावा, अशी राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांची भावना असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे 1 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करावा, यासाठी शासन आदेश त्वरित निर्गमित करून थकबाकीसह वाढीव महागाई भत्ता जानेवारी 2025 च्या वेतनासोबत वितरित करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी म्हंटले आहे.