कवयित्री सरोज आल्हाट यांचा नाशिक मध्ये साहित्य सेवा व प्रबोधन पुरस्काराने गौरव
मराठी व इंग्रजीतील काव्य संग्रहाचे मान्यवरांकडून कौतुक
नगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री सरोज आल्हाट यांना सामाजिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथील भावना बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य सेवा व प्रबोधन पुरस्काराने गौरविण्यात आले.
नाशिक येथील टिळक रोड, औरंगाबादकर सभागृहात झालेल्या राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार 2024-25 प्रदान सोहळ्यात नाशिकचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते आल्हाट यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ॲड. नितीन ठाकरे, माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ लेखक डॉ. बापूराव देसाई, सहसचिव मु.न. शेट्टीवार, रमेश चौधरी, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बेणी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव शिरसाठ, संस्थेचे सचिव महेश मुळे, अध्यक्ष भरत देवरे, भाऊसाहेब बावा आदी उपस्थित होते.
सरोज आल्हाट यांच्या नुकतेच प्रकाशित झालेल्या मराठी मधील अनन्यता व इंग्रजीतील इंप्रिंट्स ऑफ नेचर ॲण्ड माय सोल या काव्य संग्रहाचे उपस्थित पाहुण्यांची विशेष कौतुक करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आल्हाट यांचे दोन्ही काव्य संग्रह अत्यंत दर्जेदार असल्याने वाचकांच्या पसंतीस उतरत आहे. आल्हाट या मराठी काव्य संग्रहाबरोबरच इंग्रजी काव्यसंग्रह लिहिणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या कवयित्री आहेत. त्या गेल्या 30 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक, साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, सामाजिक चळवळीतही महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याच्या योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरीय साहित्य सेवा व प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.