भिंगारच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये सुविधा पुरवा

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

जॉगिंग पार्क मधील दुरावस्थेचा वाचला पाढा; सुविधा पुरविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्‍वासन

नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नुकतेच हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या शिष्टमंडळाने मोरे यांची भेट घेऊन जॉगिंग पार्क मध्ये निर्माण झालेल्या समस्यांविषयी चर्चा करुन उद्यानातील दुरावस्थेचा पाढा वाचला.
भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी सदर प्रश्‍न तातडीने निर्णय घेऊन सुविधा पुरविण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, अविनाश जाधव, अनंत सदलापूर, सचिन चोपडा, रतन मेहेत्रे, रामचंद्र कदम, सखाराम अळकुटे आदी उपस्थित होते.
भिंगार मधील छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगीग पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक संध्याकाळी व सकाळी फिरण्यास व व्यायामासाठी येतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची संख्या देखील अधिक असते. ग्रुपच्या माध्यमातून निरोगी आरोग्यासाठी योग, प्राणायाम देखील केले जाते. उद्यान गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने झाडे पाण्याअभावी कोमेजून गेली आहे. ओपन जिमचे अनेक साहित्य तुटले असून, नादुरुस्त असलेल्या साहित्यामुळे नागरिकांना व्यायाम करण्यास अडचण येत आहे. उद्यानातील कारंजे, पथदिवे व साऊंड सिस्टिम बंद पडलेली आहे. अपुरे कर्मचारी असल्याने येथील स्वच्छतागृहाची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी व घाण पसरली आहे. नागरिकांना शुध्द पाण्याची व्यवस्था नसल्याने शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
उद्यानातील ओपन जिमसह, कारंजे, खेळणे, पथ दिवे व साऊंड सिस्टिमची दुरुस्ती करावी, झाडांसाठी पाणी उपलब्ध करावे, स्वच्छता गृहाची वेळोवेळी स्वच्छता व्हावी, उद्यानातील कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वाढवावे, नागरिकांना पिण्यासाठी शुध्द पाण्याची व्यवस्था करावी, उद्यानात कीटकनाशक औषधाची फवारणी करण्याची मागणी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.