“घरपट्टी पाणीपट्टी माफी” झालीच पाहिजे…
महापालिका अधिनियम 1949 कलम 133 अ ची अंमलबजावणी करासैनिक समाज पार्टीची शनिवारी मागणी शहर सुधार समितीचा आंदोलनास पाठिंबा
ऋषिकेश राऊत
अहमदनगर
महापालिकेने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 अ ची अंमलबजावणी करुन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन करणार्या शहर सुधार समितीस समाज पार्टीच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी डमाळे व प्रदेश सचिव अरुण खीची यांनी शहर सुधार समितीचे भैरवनाथ वाकळे, संजय झिंजे यांच्याकडे सदर पत्र सुपुर्द करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या जनप्रबोधन फेरीत सहभागी झाले. कोरोना साथीच्या रोगाची परिस्थिती असताना महापालिकेने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 अ अन्वये शहरातील नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची गरज आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीने नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. कोरोनाच्या टाळेबंदीत अनेकांनी नोकर्या गमावल्या, हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली. तर सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेने कर वसुल करणे चुकीचे आहे. संकटकाळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. या न्याय मागणीसाठी शहर सुधार समितीने सुरु केलेल्या जन आंदोलनात सैनिक समाज पार्टीचा पुर्णत: पाठिंबा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष शिवाजी डमाळे म्हणाले की, समाजाला जागृत करुन लोकतंत्र निर्माण करण्यासाठी सैनिक समाज पार्टी कार्यरत आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल बलबीर सिंग परमार यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत लोकतंत्र वाचविण्यासाठी पक्षाची वाटचाल सुरु आहे. पक्षाच्या विचारधारेप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शहर सुधार समितीने सुरु केलेल्या या आंदोलनात सैनिक समाज पार्टी उतरली असल्याचे त्यांनी सांगितले.