‘तुम्ही सरकारमध्ये जा; मी अध्यक्षपद सोडतो,’ असे पवार म्हणाले होते

अजित पवार यांचा गौप्यस्फोट

भाजपासोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली होती. शरद पवारांनी मला बोलावून सांगितले की, ‘आता सरकारमध्ये जा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो.’ असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराचा समारोप करताना, पवार यांनी राष्ट्रवादीत पडलेली फुट आणि सत्ता स्थापनेनंतरचा घटनाक्रम प्रथमच सविस्तरपणे उलगडला. आम्ही 2 जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता. तर 15 दिवसांनी 17 जुलैला आम्हा सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशाला बोलावले? तुम्ही आम्हाला गाफील ठेवायचे आहे का? अशी उद्विग्नता अजित पवार यांनी व्यक्त केली. पुस्तक प्रकाशनानंतर शरद पवार यांनी राजीनामा दिला. पण त्यानंतर आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना शरद पवारांनी बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले, “उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला आणि युवक पाहिजेत त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या.” तेव्हा मला प्रश्न पडला की, राजीनामा द्यायचा नव्हता, तर दिलाच का? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. आम्हाला सांगितले की, माझ्यानंतर सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा सगळ्या गोष्टी ठरल्या. सगळ्यांनी तयारी दाखवली. ‘ही धरसोड वृत्ती गाफील ठेवणे बरोबर नाही, हे मला पटत नाही तुम्ही एकदा काय ते ठरवा.’ हे मी त्यांना सांगितल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.