5 डिसेंबरला धडकणार मिचाँग चक्रीवादळ
काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा इशारा
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरातील दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. गेल्या सहा तासात हे चक्रीवादळ ताशी 9 km वेगाने पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे. 1 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत पुद्दुचेरीपासून सहाशे तीस किमी पूर्व दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचा केंद्रबिंदू तयार झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ही प्रणाली पश्चिम उत्तर पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. येत्या 12 तासात हे चक्रीवादळ खोल दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत होईल आणि तीन डिसेंबर पर्यंत नैऋत्य बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळात रूपांतरित होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हे चक्रीवादळ 4 डिसेंबरच्या सकाळपर्यंत दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तमिळनाडूच्या किनारपट्टीवर थडकेल. ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच नेल्लोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान 5 डिसेंबरच्या दुपारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा कमाल वेग ताशी 80 ते 90 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी शुक्रवारी 12 जिल्हा प्रशासन प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत तमिळनाडूच्या विविध जिल्ह्यांमध्ये येत्या दोन-तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवश्यक अशा सूचना दिल्या. तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपायोजना करण्याचे निर्देश दिले कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने शुक्रवारी बंगालच्या उपसागरातील मिचाँग चक्रीवादळासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या तयारीचा आढावा घेतला.