पाकिस्तानच्या सर्व सरकारी कंपन्या विक्रीला

शहाबाद सरकार परदेशी खरेदीदारांच्या शोधात

दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर असलेल्या पाकिस्तानने, देशातील सर्व सरकारी कंपन्या विक्रीला काढल्या आहेत. खाजगीकरण आयोगाच्या मंगळवारच्या बैठकीत, पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी हा निर्णय घेतला. पाकिस्तानात एकूण 88 सार्वजनिक उपक्रम आहेत. अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. यापैकी बहुतांश कंपन्या तोट्यात असून त्यांचा देश- देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नात 44% वाटा आहे. पहिल्या टप्प्यात 24 कंपन्या विकण्यात येणार आहे. त्यांची यादी तयार झाली असून, यामध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे विक्रीचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट आहे की, देशातील एकही उद्योगपती तोट्यातील कंपन्या खरेदी करण्यास तयार होणार नाही, त्यामुळे सरकार संयुक्त अरब अमीराती, सौदी अरेबिया, कतारमधील तेल उत्पादक कंपन्यांच्या शोधात आहे. समरिकदृष्ट्या महत्त्वाच्या कंपन्यांवर केवळ सरकार ताबा ठेवणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दबावाखाली शहाबाद सरकारने हा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी शाहबाज यांची आयएमएफच्या पथकासोबत बैठक झाली. त्यामध्ये तीन अब्ज डॉलर्स कर्ज फेडण्यासाठी सरकारी कंपन्या विकण्याची योजना असल्याचे शहाबाज यांनी सांगितले होते. त्याला आयएमएफने होकार दिला.