आयुक्त जावळे देशपांडे एसीबी ला सापडेनात

महापालिका लाच प्रकरण

महापालिकेतील लाच प्रकरण गुन्हा दाखल होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र आयुक्त जावळे व त्यांचा स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे अद्याप लाचलूचपत प्रतिबंध पथकाला सापडलेले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्याचा तपासही थंडावल्याची चर्चा आहे. बांधकाम परवाना देण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे व स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्या पथकाने आयुक्त जावळे यांच्या वसंत टेकडी येथील शासकीय निवासाची झडती घेतली. या झडतीत कोणतीही माहिती मिळाली नाही. आयुक्त जावळे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी आहे. तसेच त्यांचा सोलापूर येथेही बंगला आहे. या दोन्ही घरांची झडती घेण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात आले आयुक्त जावळे यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या बुऱ्हानगर येथील बंगल्याची झडती घेण्यात आली आहे. त्यांच्या घरात मालमत्ता विषयीची माहिती मिळाली असून देशपांडे हे गुन्हा दाखल होण्याआधीच पसार झाले आहे. आयुक्त जावळे व स्वीय सहाय्यक देशपांडे यांच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तीन पथके रवाना झाली आहेत. परंतु जावळे व देशपांडे अद्यापही या पथकांना सापडलेले नाहीत.