महायुतीवर मतदारांचा पुन्हा विश्वास : विखे

नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदार किशोर दराडे यांना विजयी करून शिक्षक मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पसरवलेल्या खोट्या माहितीला मतदार फार काळ साथ देत नाहीत, हे या निकालाने दाखवून दिले. या विषयाने महायुतीत आत्मविश्वास निर्माण केला. अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत वेळोवेळी सकारात्मक भूमिका घेतली. त्यास प्रतिसाद देत शिक्षक मतदारांनी महायुतीला पाठबळ दिले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून मतदारांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला उत्तर देण्याची, शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही मोठी संधी होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार दराडे यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले.