अहिल्यानगरच्या के. के. रेंजवर लष्कराचे युद्ध प्रात्यक्षिक
रणगाड्यांचा मारा, सुखोईमधून हल्ला यांच्या प्रात्यक्षिकाने उपस्थित भारावले
अहिल्यानगर : रणगाड्यांतून लक्ष्यावर केलेला अचूक मारा, हेलिकॉप्टरवरून शत्रूवर झालेला बॉम्बचा वर्षाव, सुखोई लष्करी विमानाचा क्षणार्धातील क्षेपणास्त्र हल्ला. असा युद्धभूमीवरचा थरार अहिल्यानगरजवळील के. के. रेजवर सोमवारी (दि. २०)रंगला. अहिल्यानगरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या के. के. रेंज (खारेकर्जुने) या लष्कराच्या भूमीवर भारतीय लष्कराने एक तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिके दाखवली. भारतीय सैन्याच्या प्रमुख प्रशिक्षण संस्था असलेल्या अहिल्यानगरमधील आर्मड कॉर्म्स सेंटर अँड स्कूल (एसीसीएस) व मॅकेनाइज्ड इन्फंट्री सेंटर अॅण्ड स्कूल (एमआयसीएस) यांच्या वतीने के. के. रेंजवर हे युद्ध सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले. या युद्ध सरावात ड्रोनच्या मदतीने शत्रूवर पाळत ठेवून शत्रूला क्षणार्धात निष्प्रभ करण्याच्या लष्कराच्या कार्यक्षमतेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. एका ररांगेत उभे केलेल्या रणगाड्यांवरून, तसेच तोफांवरून क्षेपणास्त्र वर्षाव करण्यात आला. रणगाड्यांपासून हे लक्ष्य २ ते ५ किलोमीटरपर्यंत होते. परंतु अचूक मारा करत लष्कराने उपस्थितांची वाहवा मिळवली. अर्जुन, भीष्म, टी-२०, टी-७२ अजेय, मुख्य लढाऊ रणगाडा एमबीटी, अर्जुन बीएमपी-२, मोटर वाहक रणगाडे या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणाऱ्या रणगाड्यामधून हवेत धूर सोडत दिवस अंधार करून शत्रूला गोंधळात टाकणारी कला यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. याशिवाय या रणगाड्यामध्ये धूर निर्माण करण्याची असलेली क्षमता, या रणगाड्यामध्ये असलेल्या गन, अणुयुद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची असलेली क्षमता याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. एकूणच अहिल्यानगरजवळील के. के. रेंज या लष्कराच्या युद्धसराव भूमीवर सोमवारी दाखवण्यात आलेल्या प्रात्यक्षिकामुळे उपस्थितांमध्ये कुतूहल आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले होते.